Jump to content

सौर औष्णिक ऊर्जा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सौर औष्णिक ऊर्जा ही सूर्यातून उष्मारुपाने उत्सर्जित होणारी ऊर्जा होय.

सूर्य हा पृथ्वीवरील सर्व ऊर्जेचा स्रोत आहे. सूर्या वर होणाऱ्या आण्विक एकीकरण प्रक्रियेमुळे सौर ऊर्जा उत्सर्जित होते. आण्विक एकीकरण प्रक्रियेमध्ये हायड्रोजन अणूचे प्रोटॉन्स एकमेकांवर आदळून त्यांचा मिलाफ होतो व हेलियमचा अणू तयार होतो. ह्या प्रक्रियेला पी-पी किंवा प्रोटॉन-प्रोटॉन साखळी प्रक्रिया असे म्हणतात.सूर्या वर निर्माण होणारी ही ऊर्जा विद्युत-चुंबकीय लहरींच्या माध्यमातून सर्वत्र पोचते.

पृथ्वीच्या वातावरणात पोचणारी जवळपास 30% सौर ऊर्जा ही पृथ्वीच्या वातावरणामुळे परावर्तीत होते, तर जवळपास 19 % सौर ऊर्जा ही ढग,धूलिकण, प्रदूषक इत्यादी घटक शोषून घेतात.त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर केवळ 51 % ऊर्जा पोचते.पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोचणाऱ्या या उर्जेपैकी 50% सौर ऊर्जा ही दृश्य वर्णपटात असते तर उरलेली 50% ऊर्जा मुख्यत्वे इन्फ्रारेड व काही प्रमाणात अतिनील वर्णपटात असते.   भारत हा सौर ऊर्जेच्या बाबतीत समृद्ध देश आहे.मध्य महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान तसेच कर्नाटक, तामिळनाडू व केरळ ह्या राज्यांच्या काही भागात दररोज 5.5 ते 6.0 KWh/m2 इतकी सौर ऊर्जा जमिनीच्या पृष्ठभागावर मिळते. तर उर्वरित महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढ इत्यादी राज्यात हे प्रमाण 5 ते 5.5 KWh/m2 प्रती दिवस इतके आहे.

सौरऔष्णिक तंत्रज्ञान

सूर्यापासून मिळणारी ही ऊर्जा सौरऔष्णिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपयोगात आणली जाते. सौरऔष्णिक तंत्रज्ञान सूर्याच्या औष्णिक ऊर्जेचा वापर तापवण्यासाठी आणि विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी करते. सौरऔष्णिक तंत्रज्ञानाच्या दोन प्रणाली आहेत, सक्रिय प्रणाली व निष्क्रिय प्रणाली. निष्क्रिय प्रणालींमध्ये योग्य रचनेचा किंवा आराखड्यांचा वापर करून सूर्यप्रकाश व सूर्यापासून मिळणारी उष्णता उपयोगात आणली जाते.उदाहरणार्थ घरे,इमारती इत्यादींची रचना अशाप्रकारे करणे की त्याच्यामूळे भरपूर प्रकाश व उष्णता मिळेल. सक्रिय प्रणालींमध्ये यांत्रिक अथवा विद्युत साधनांचा वापर करून सौर ऊर्जा उपयोगात आणली जाते. उदाहरणार्थ सौर पाणी तापक आणि सौर तावदाने.