थायलंड
थायलंडचे (थाई: ราชอาณาจักรไทย, राच्च आनाचक थाय, अर्थ: राज्य आज्ञाचक्र थाय) म्हणजेच सयाम हा आग्नेय आशियातील एक देश आहे. या देशाच्या पूर्वेस लाओस व कंबोडिया, दक्षिणेस थायलंडचे आखात व मलेशिया तर पश्चिमेस अंदमानचा समुद्र व ब्रह्मदेश आहेत. बँकॉक ही या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. थायलंडमध्ये घटनात्मक राजेशाही असली तरीही प्रशासकीय कारभार संसदीय लोकशाही पद्धतीने चालतो.
इतिहास
[संपादन]वर्तमान थायलंडाच्या भूप्रदेशावर सुमारे ४०,००० वर्षांपासून मानवाचे वास्तव्य असल्याचे पुरावे आहेत. या प्रदेशातील संस्कृतीवर प्राचीन काळापासून - म्हणजे इ.स.च्या १ल्या शतकातील फूनान राज्यापासून - भारतीय उपखंडातील संस्कृतीचा प्रभाव आहे. फूनान राज्यानंतर येथे ख्मेर साम्राज्याची सत्ता इ.स.च्या १३व्या शतकापर्यंत चालली. ख्मेरांचे साम्राज्य लयास गेल्यावर काही काळ ताय, मोन, ख्मेर, मलय समूहांची छोटी छोटी राज्ये उभी राहिली. इ.स. १२३८ साली आजच्या थायलंडाच्या उत्तर भागात सुखोथाई साम्राज्य उदयास आले. ही सयाममधील पहिली बौद्ध सत्ता मानली जाते. मात्र अवघ्या एका शतकानंतर (इ.स.च्या १४व्या शतकाच्या मध्यावर) दक्षिणेकडील चाओ फ्रया नदीच्या तीरावर उदयास आलेल्या अयुध्या साम्राज्याने सुखोथाई व परिसरातील अन्य सत्तांना झाकोळून टाकले. या साम्राज्याच्या काळात अयुध्या नगराचा व्यापार अरबी द्वीपकल्प, पर्शिया, भारत, चीन इत्यादी आशियाई व्यापारी केंद्रांशी, तसेच डच, पोर्तुगीज, ब्रिटिश इत्यादी युरोपीय व्यापाऱ्यांसहदेखील चाले.
इ.स. १७६७ सालच्या आक्रमणादरम्यान बर्मी सैन्याने अयुध्या लुटली, उद्ध्वस्त केली. तेव्हा राजा तक्षिणाने अजून दक्षिणेस जाऊन चाओ फ्रया नदीच्या तीरावरच्या धोनपुरी या ठाण्यास आपली राजधानी हलवली व तेथून १५ वर्षे राज्य चालवले. इ.स. १७८२मध्ये बुद्ध योद्फा चुलालोक या सेनाधिकाऱ्याने तक्षिणाची राजवट उलथून चक्री घराण्याची सत्ता स्थापली व राजधानी म्हणून बांकोकास निवडले. चक्री घराण्याच्या राजवटीपासूनच्या या काळास रतनकोशिन कालखंड असे अभिधान असून, थायलंडाच्या आधुनिक पर्वाचा तो आरंभ मानला जातो.
इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात आशिया व आफ्रिका खंडातील अन्य भूप्रदेशांत वसाहतवादाचा शिरकाव होत असताना मात्र थायलंड कधीच कोण्याही युरोपीय वसाहतवादी सत्तेपुढे नमला नाही. आग्नेय आशियातील वर्चस्वस्पर्धेत फ्रेंच व ब्रिटिश अश्या दोन्ही वसाहतवादी सत्तांशी चातुर्याने राजनैतिक व्यवहार जपत थायलंडाने आपले सार्वभौमत्व अबाधित राखले.
इ.स.च्या विसाव्या शतकात दुसऱ्या महायुद्धात थायलंडाने जपानास सहकार्य केले. मात्र महायुद्धोतर कालखंडात बह्वंशी काळ थायलंड अमेरिकेच्या मित्रपक्षात राहिला आहे.
भूगोल
[संपादन]विस्ताराच्या दृष्टीने ५,१३,१२० वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला, आकारमानानुसार येमेनपेक्षा काहीसा छोटा व स्पेनपेक्षा काहीसा मोठा विस्तार असलेला हा देश जगातला ५१व्या क्रमांकाचा मोठा देश आहे.
भूरचनेनुसार थायलंडमध्ये पर्वतीय प्रदेश, पठारी प्रदेश, नदीखोऱ्यांपासून, तसेच अगदी संयोगभूमीसारख्या भूरूपांपर्यंतचे वैविध्य आढळते. थायलंडच्या उत्तरेकडील भूभाग डोंगराळ आहे. येथील थानोन धोंग्चाय पर्वतरांगांतील २,५६५ मी. उंचीचे तोय इंदानोन हे ठिकाण देशातील सर्वोच्च ठिकाण आहे. देशाच्या ईशान्येकडील ईशान प्रांताचा व आसपासचा भाग खोरात पठाराने व्यापला आहे. खोरात पठाराच्या पूर्वांगाने वाहणारी मेकोंग नदी थायलंडच्या पूर्वसीमेलगत वाहत जाते. देशाच्या मध्यभागात चाओ फ्रया नदीचे खोरे वसले असून या खोऱ्यातून ही दक्षिणवाहिनी नदी थायलंडच्या आखातास जाऊन मिळते.
थायलंडचा दक्षिणेकडील भूप्रदेश क्रा संयोगभूमीवर वसला आहे. क्राची संयोगभूमी थायलंडच्या मुख्य भूभागास मलय द्वीपकल्पाशी जोडते.
राजकीय विभाग
[संपादन]मोठी शहरे
[संपादन]समाजव्यवस्था
[संपादन]धर्म
[संपादन]बौद्ध धर्म हा केवळ थायलंडचा प्रमुख धर्म नसून तो देशाचा राष्ट्रधर्म (राजधर्म) देखील आहे. थायलंड मधील ९५% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. येथे ख्रिश्चन, मुस्लिम व हिंदू अनुयायी अल्पप्रमाणात आढळतात. थायलंड देशाला बौद्ध भिक्खूंचा देश असेही म्हणतात कारण येथे बौद्ध भिक्खूंची संख्या अन्य बौद्ध देशांमधील भिक्खूंपेक्षा सर्वाधिक आहे. या देशात ४०,००,००० पेक्षा अधिक बौद्ध भिक्खू आहेत.
वस्तीविभागणी
[संपादन]शिक्षण
[संपादन]शिक्षण
[संपादन]सांस्कृृतिक इतिहास
[संपादन]सयाम हे नाव श्याम या शब्दाचेच रूप आहे. कंबुज साम्राज्याच्या वैभव काळात सयाम हा या साम्राज्याचाच एक भाग होता.त्यामुळे सयामवर अर्थातच हिंदू संस्कृतीचा प्रभाव पडलेला दिसतो. भारतात जितक्या पद्धतींची बौद्ध मंदिरे आणि बुद्ध मूर्ती आहेत त्या बहुतेक सर्व प्रकारच्या मूर्ती आणि मंदिरांचे शिल्प सयाम मधील प्राचीन अवशेषात आढळून येतात. या नगरीचे प्राचीन अवशेष प्राचीन भारतीय संस्कृतीचा परिचय करून देतात. सयामच्या भाषेवर संस्कृतचा प्रभाव आहे.त्यांची राजभाषा सयामी असली तरी धर्मभाषा मात्र पाली आहे. या जनजातीने या राज्याची निर्मिती केली.मोन हे मूळचे आंध्र प्रदेशातील तेलंगी .ब्रह्मदेशात त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या,तिथूनच ते श्याम देशात आले. पारंपरिक धारणेनुसार द्वारावती राज्याची राजधानी लोबपुरी हिची स्थापना इ.स. ५७५ मध्ये झाली. हिलाच लवपुरी असेही म्हणतात.या नगरीत ख्मेर आणि थायी राजांच्या राजवाडे,प्रासाद आणि मंदिरांचे अवशेष आहेत. सुमारे तीनशे वर्षे मोन साम्राज्य वैभवसंपन्न होते.नंतर मोन राजे कंबुज राजांचे मांडलिक झाले.
इ.स.१२८३ मध्ये राम कामेंग हा राजा गादीवर आला.सयामच्या वैशिष्ट्यपूर्ण जडणघडणीची सुरुवात याच्याच कारकिर्दीत झाली.प्रजेच्या हितासाठी त्याने अनेक सुधारणा केल्या.हा राजा स्वतः बौद्ध धर्माचा उपासक होता. त्याने बौद्ध विहार आणि चैत्य बांधले विवान भिक्षू या विहारांमधून ज्ञान देऊ लागले.भारतीय साहित्य आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास सयाममध्ये होत असे. राजा राम कामेंग याने संस्कृत आणि पाली यांच्याशी मिळतीजुळती सयामी भाषा प्रचारात आणली. १३५० मध्ये सयामच्या पश्चिम भागात रामाधिपती नाव धारण करून एका पराक्रमी राजाने आपली सत्ता वाढविली. द्वारावती ही त्याची नगरी. त्याने राजधानीचे नाव अयोध्या असे ठेवले. रामाधिपती हा राजा शूर आणि मुत्सद्दी होता. तो बौद्ध धर्माचा अनुयायी असला तरी शंकर आणि विष्णू यांचीही उपासना करी. त्याने शिव आणि विष्णू यांची मंदिरे बांधली आहेत. त्याने त्रिपिटक, वेद शास्त्रागम या सर्वांचा अभ्यास केलेला होता. त्याच्या शासनाचा नैतिक पाया होता मनुस्मृती हा ग्रंथ.[ संदर्भ हवा ] सयामचे कायदेही या आधारावर निर्माण झाले आहेत.[४] बुद्ध धम्माची बौद्ध संस्कृती येथे विराजमान आहे. देशातील प्रत्येक घरासमोरच भगवान बुद्ध यांचे चित्र लावलेले असते.
राष्ट्रीय ग्रंथ
[संपादन]रामायण हा थायलंडचा राष्ट्रीय ग्रंंथ आहे असे मानले जाते. सयामच्या राष्ट्रीय जीवनात रामायण-उत्सवांना विशेष स्थान आहे. रामायणातील कथाप्रसंग हे थायलंडमधील नाट्य आणि लोकनाट्याचे विशेष विषय आहेत. वाल्मिकीकृत रामायणापेक्षा थाई रामायणाचे कथानक काहीसे वेगळे आहे.
राजकारण
[संपादन]अर्थतंत्र
[संपादन]पर्यटन हा या देशाचा मुख्य व्यवसाय आहे
वाहतूक
[संपादन]थाई एअरवेजचा प्रमुख वाहतूकतळ असलेला बँकॉकमधील सुवर्णभूमी विमानतळ हा थायलंडमधील सर्वात मोठा व वर्दळीचा विमानतळ आहे.
खेळ
[संपादन]फुटबॉल हा सध्या थायलंडमधील लोकप्रिय खेळ आहे. ए.एफ.सी. फुटबॉल मंडळाचा सदस्य असलेल्या थायलंडने १९७२ व २००७ साली ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले होते. थायलंड फुटबॉल संघाने आजवर ६ वेळा आशिया चषकामध्ये पात्रता मिळवली आहे. बँकॉकने आजवर आशियाई खेळ स्पर्धांचे विक्रमी चार वेळा आयोजन केले आहे (१९६६, १९७०, १९७८ व १९९८).
संदर्भ
[संपादन]- ^ CIA — The World Factbook -- Thailand. 2009-10-03. https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/th.html Archived 2010-12-29 at the Wayback Machine.
- ^ a b "Thailand". 2010-04-21 रोजी पाहिले.
- ^ "Human Development Report 2009. Human development index trends: Table G" (PDF). 2009-10-05 रोजी पाहिले.
- ^ डाॅॅ.हेबाळकर शरद,भारतीय संंस्कृृतीचा विश्वसंंचार,भारतीय विचार साधना प्रकाशन
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत शासकीय संकेतस्थळ
- विकिव्हॉयेज वरील थायलंड पर्यटन गाईड (इंग्रजी)
- थायलंडचे विकिमिडिया अॅटलास
- थायलंड मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळे Archived 2020-10-07 at the Wayback Machine.