नळदुर्ग
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
नळदुर्ग | |
मुख्य दरवाजा | |
नाव | नळदुर्ग |
उंची | {{{उंची}}} |
प्रकार | भुईकोट |
चढाईची श्रेणी | अत्यंत सोपी |
ठिकाण | धाराशिव जिल्हा, महाराष्ट्र |
जवळचे गाव | तुळजापुर , उस्मानाबाद |
डोंगररांग | धाराशिव |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | {{{स्थापना}}} |
नळदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव (पूर्वीचे उस्मानाबाद) जिल्ह्यामधील एक किल्ला आहे. नळदुर्ग किल्ला हे एक प्रसिद्ध प्राचीन किल्ला आहे. नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे. याची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी. लांब पसरलेली आहे. या तटबंदीत ११४ बुरूज आहेत. महाराष्ट्राच्या गिरिदुर्ग, जलदुर्गांबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत. या भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग होय. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. यामध्ये हिंदू धर्माच्या काही मंदिरांचा सुद्धा समावेश आहे जसे की गणपती महाल, लक्ष्मी महाल हे पाहण्यासाठी आकर्षक आहेत. येथे धबधबा आहे त्यासाठीहि हा किल्ला प्रसिद्ध आहे.
कसे जाल ?
[संपादन]नळदुर्ग किल्ला हा धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात आहे. पुणे - हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग आहे. सोलापूरकडून हैदराबादकडे निघाल्यावर ४८ कि.मी. अंतरावर नळदुर्ग गाव लागते. तसेच हे नाव निजामशाही काळात देण्यात आले. नंतर नळ राजाने हा किल्ला काबीज केला व आलीयाबादचे नाव बदलून नळदुर्ग हे नाव ठेवण्यात आले.
इतिहास
[संपादन]स्थानिक लोक नळदुर्गाचा इतिहास नळराजा व दमयंती राणी पर्यंत नेऊन पोहोचवितात. हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता. पुढे तो बहामनी सुलतानांच्या ताब्यामध्ये आला. बहामनी राज्याची शकले उडाली व त्यातून ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या आदिलशहीने नळदुर्गावर कब्जा मिळवला. पुढे औरंगजेब या मोगल बादशहाने नळदुर्ग जिंकला आणि त्याची जबाबदारी हैदराबादच्या निजामाकडे सोपवली.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
[संपादन]सध्याच्या नळदुर्ग किल्ल्याची उत्तम बांधणी आदिलशहाच्या काळामध्ये झालेली आहे. संरक्षणासाठी किल्ल्याच्या भोवती मोठ्या भागात खंदक आहे. त्याच्या आतल्या बाजूला दुहेरी तटबंदी आहे. किल्ल्याच्या बाजूच्या पठारावर रणमंडळ म्हणून तटबंदीने युक्त असा भाग आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांच्यामध्ये असलेला खंदक खोल करण्यात आला असून त्यात पाणी आहे. हे पाणी बोरी नदीचा प्रवाह अडवून तो वळवून या खंदकात आणण्यात आला. हे पाणी कायम रहावे म्हणून रणमंडळ आणि नळदुर्ग या मध्ये धरणाच्या बंधाऱ्यासारखी भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीमुळे खंदकामध्ये कायमस्वरूपी पाणी साठून रहाते. त्यामुळे या बाजूने शत्रूला किल्ल्यामध्ये शिरकाव करता येत नाही. खंदक आणि नदीचा प्रवाह याने अभेदता निर्माण करून आतमध्ये शंभरावर बुरुजांनी जोडलेली भक्कम तटबंदी आहे. वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या बुरुजांचे बांधकाम आपल्याला दिसून येते. यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असलेला नवबुरुज आपल्या लक्षात रहातो. हैद्राबाद महामार्गाच्या बाजूला असलेल्या तटबंदीमध्ये हा बुरूज आहे. या भल्याथोरल्या बुरुजाला नऊ पाकळ्या आहेत. यामुळे याला नवबुरुज म्हणतात. असे बांधकाम इतरत्र कोठेही पहायला मिळत नाही. नळदुर्ग किल्ल्यामधील जलमहाल असणारा बंधारा हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांना जोडणाऱ्या बंधाऱ्यामध्ये जलमहाल आहे. हा बंधारा १९ ते २० मीटर उंच आहे. बंधाऱ्यामध्ये चार मजले आहेत. बंधाऱ्याच्या पोटातील या मजल्यामध्ये जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. बंधाऱ्याच्या पोटामध्ये अर्ध्या उंचीवर हा जलमहाल बांधलेला असून याच्या खिडक्या नक्षीदार महिरपीने सजवलेल्या आहेत. याच्या भिंतीवर फारशी लिपीतील शिलालेख आहे. शिलालेखात सांगितले आहे की, या जलमहालाकडे दृष्टी टाकल्यास मित्रांचे डोळे प्रसन्नतेने उजळतील तर शत्रूच्या डोळ्यापुढे अंधारी येईल. पावसाळ्यामध्ये पाणी वाढल्यावर या बंधाऱ्यामधून वाहून जाण्यासाठी दोन मार्ग ठेवलेले असून त्यांना नर व मादी अशी नावे आहेत.
नळदुर्ग किल्ला हा त्याची रचना, संरक्षण व्यवस्था, टेहळणीचा उपळ्या बुरूज, त्यावरील लांब तोफ,धबधबा, दरवाजाचा वक्राकार मार्ग वगैरेंमुळे चांगलाच लक्षात रहातो.
छायाचित्रे
[संपादन]-
मुख्य दरवाजा
-
हत्ती आणि मगर तोफ
-
पाणी महाल
-
दारु-गोळा कोठार