Jump to content

पद्मदुर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कासा उर्फ पद्मदुर्ग या पानावरून पुनर्निर्देशित)
किल्ले पद्मदुर्ग
चित्र:10180 MahaS.jpg
कासा उर्फ पद्मदुर्ग
नाव किल्ले पद्मदुर्ग
उंची 500

फूट

प्रकार जलदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण रायगड, महाराष्ट्र
जवळचे गाव रायगड,मुरुड
डोंगररांग किनारपट्टी
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


भौगोलिक स्थान

[संपादन]

पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेला मध्ययुगीन जलदुर्ग आहे. मराठा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला मुरूड गावाजवळील समुद्रात आहे. मुरूड रायगड जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव आहे. मुरूडजवळ जंजिरासामराजगड असे इतर किल्ले आहेत.

इतिहास

[संपादन]

जवळ असलेल्या जंजिरा किल्ल्याच्या सहाय्याने सिद्दी अतिशय प्रबळ झाले. त्यांच्या आरमारी सामर्थ्याने त्यांनी किनारपट्टीवर दरारा निर्माण केला. सिद्द्यांच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी शिवाजीराजांनी मुरूडच्या समुद्रातल्या कासवाच्या आकाराच्या बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पद्मदुर्ग ऊर्फ कासा हा जलदुर्ग बांधला. त्याबद्दल महाराजांनी उद्गार काढले, "पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापुरी उभी केली आहे. कासा किल्ल्यामुळे जंजिऱ्याच्या सिद्दीला चांगलाच पायबंद बसला.".

येथील एक गोष्ट इतिहासात ठळकपणे नोंदली आहे, ती म्हणजे पद्मदुर्गाच्या लाय पाटलांनी धाडसाने जंजिऱ्यावर हल्ला करण्यासाठी मोरोपंतांना साह्य केले होते. पाटलांनी रात्रीच्या वेळी जंजिऱ्याच्या मागील बाजूस पद्मदुर्गावरून येऊन तटबंदीला शिड्या लावण्याचे धाडस केले होते. तटबंदीवर असलेली भक्कम सुरक्षाव्यवस्था भेदणे हे मोठे धाडसाचे काम होते; पण मोरोपंतांची व पाटलांची वेळ जुळली नाही व प्रयत्न फसला; पण त्यांनी दाखविलेले धाडस पाहून शिवाजी महाराजांनी लाय पाटील याना पालखीचा मान दिला; पण दर्यात फिरणाऱ्या कोळ्यांना पालखीचा काय उपयोग, असे म्हणून लाय पाटलाने नम्रपणे पालखी नाकारली. यावरून महाराजांच्या काय ते लक्षात आले. त्यांनी मोरोपंतांना, एक नवे गलबत बांधून त्याचे नाव ‘पालखी’ असे ठेवून लाय पाटलांच्या ते स्वाधीन करण्यास सांगितले. याशिवाय राजांनी लाय पाटलास छत्री, वस्त्रे, निशाण व दर्याकिनारीची सरपाटीलकी दिली. पद्मदुर्गावर जाण्यासाठी दंडाराजपुरीचे कोळी लोक नावा किंवा यांत्रिक बोटीने समुद्राचे तानमान पाहून घेऊन जातात. किल्ला नौदलाच्या ताब्यात आहे. त्यामुळे तेथे जाण्यासाठी त्यांची परवानगी लागते.

रचना व वैशिष्ट्ये

[संपादन]

कासा किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट. पडकोट मोठ्या प्रमाणावर नामशेष होत आला आहे, परंतु मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तमपैकी शाबूत आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरून उभा आहे. या बुरुजाच्या वरचा भाग फुललेल्या कमळाच्या पाकळ्याप्रमाणे आहेत. म्हणूनच याला पद्मदुर्ग असे नाव दिले गेले असावे.

या किल्ल्याच्या बांधकामाचे एक वैशिष्ट्य येथे पहावयाला मिळते. तटबंदीच्या दोन दगडांमधे सिमेंटिंग म्हणून चुना वापरलेला आह. गेल्या साडेतीनशे वर्षामधे सागराच्या लाटांच्या तडाख्याने आणि खाऱ्या पाण्यामुळे तटबंदीचा दगड झिजून गेला आहे. या दगडाची झीज पाच ते दहा से.मी. एवढी झाली आहे. तरीही दोन दगडांमधला चुना अजूनही शाबूत आहे. शिवकालीन बांधकामाचे हे वैशिष्ट्य माणसाला चकित करते. पडकोटामधील चौकोनी विहीर, तोफा, इमारतींचे अवशेष असे पाहून मुख्य किल्ल्याकडे गेल्यावर पडकोट आणि मुख्य किल्ला या मधील खडकावर समुद्रामधून वाहून आलेल्या शंख शिंपल्यांचा ढीग साचलेला दिसतो.

पद्मदुर्गाच्या महाद्वारामधे प्रवेश करण्यासाठी चार पाच पायऱ्या चढाव्या लागतात. दाराच्या आतल्या बाजूला पहारेकऱ्यांसाठी केलेल्या देवड्या आहेत. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्गही आहे. मधल्या भागामधे नव्या जुन्या वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. काही काळ भारतातील कस्टम ऑफिसचे एक कार्यालय येथे थाटलेले होते. हे चौकीवजा कार्यालय येथून हलल्यावर या सगळ्या वास्तूचा ताबा निसर्गाकडे आला त्यामुळे सगळ्या वास्तूंची रयाच गेलेली दिसते. चारही बाजूंनी खारे पाणी असताना आतमधे गोड्या पाण्यासाठी चार टाकी केलेली दिसतात.

तटबंदीवरून जंजिरा आणि सामराजगड किल्ले दिसतात. तसेच येथून मुरूडचा किनाराही उत्तम दिसतो.

गडासाठी मुरूड/राजपुरीला जाण्याचे मार्ग

[संपादन]

मुरूडला जाण्यासाठी अलिबाग-रेवदंडा-मुरूड हा एक गाडी मार्ग आहे. मुंबई-पणजी महामार्गावरील नागोठणे अथवा कोलाड येथून रोहे, नंतर रोहे-चणेरे बिरवाडी मार्गे मुरूडला जाता येते. तसेच मुंबई-पणजी महामार्गावरील इंदापूर येथून तळा-भालगाव मार्गेही मुरूड गाठता येते.

मुरूड गावातून राजपुरीकडे जाणारा गाडी रस्ता आहे. या रस्त्यावरच्या खाडीलगत एकदरा गाव आहे. याच्या किनाऱ्यावर अनेक मच्छीमारी नावा उभ्या असतात. या मच्छीमारी नौकावाल्यांकडे चौकशी केल्यास त्‍यांतील एखादी नौका आपल्याला कासा किल्ल्याकडे घेऊन जाऊ शकते. समुद्राची आणि हवामानाची परिस्थिती पाहूनच हे मच्छीमार पद्मदुर्गाकडे येण्यासाठी तयार होतात. एकदऱ्यापासून किंवा राजपुरीपासून नावेने तासाभरात आपण कासा किल्ल्याला पोहोचतो.

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]