डाळिंब
डाळिंब लाल रंगाचे एक फळ आहे. यात लाल रंगाचे अनेक पाणीदार, गोड दाणे असतात. वनस्पतीचे शास्त्रीय नाव "प्युनिका ग्रॅनेटम" असे आहे. डाळिंबाला संस्कृतमध्ये "दाडिम' म्हणतात, व इंग्रजीत पोमग्रॅनेट. हे एक पित्तशामक फळ आहे. ही वनस्पती साधारण ३ ते ५ मीटर उंच होते. या फळाचा उगम इराण, अफगाणिस्तान आणि बलुचिस्तान येथे आहे असे मानले जाते. डाळिंब हे फळ आवडीने खातात. डाळिंबात दातासारखे दिसणारे दाणे असतात. या फळापासून आयुर्वेदिक औषधी बनविली जाते. आरोग्यास उपुक्त ठरते
उपयोग
[संपादन]डाळिंब ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. दाडिमाष्टक, दाडिमादि चूर्ण, दाडिमाद्य तेल आदी औषधीत डाळिंबाचा वापर होतो. डाळिंबाची साल उगाळून खाल्ल्यास जुलाब थांबतात[ संदर्भ हवा ]. साल नुसती तोंडात ठेवली की खोकला आटोक्यात येतो .[ संदर्भ हवा ] हृदयातील अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवण्याचे काम डाळिंबामधील औषधी गुण पार पाडतात. डाळींब खाणाऱ्यांची त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते. शेंदूर खाल्याने बिघडलेला स्वर, रोज डाळिंब खाल्ल्यास सुधारण्यास मदत होते. २० ग्रॅम डाळिंबरस व १० ग्रॅम खडीसाखर एकत्र करून घालून दिल्याने कावीळ बरी हाेते. डाळिंब हे खूप महत्त्वाचे फळ आहे. या मध्ये लोहाचे प्रमाण असते .
पपनसाचा कडवटपणा कमी करण्यासाठी पपनसाच्या फोडींत डाळिंबाचे दाणे घालून खातात.
दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवीला डाळिंबाचे दाणे घातलेल्या लाह्यांचा प्रसाद असतो.
महाराष्ट्रातील जाती
[संपादन]- गणेश - बिया मऊ, चव गोड.
- जी - १३७ - दाणे मऊ.
- मृदुला - फळे आकाराने मध्यम
- आरक्ता - गोड, टपोरे, आकर्षक दाणे, चमकदार साल, गडद लाल रंग.
- भगवा - उत्तम चव .
- सोलापूर लाल- आकर्षक रंग, उत्तम आकार, गोड चव
रोग
[संपादन]बागेतल्या डाळिंबांना तेलकट डाग रोगाचा विकार होऊ शकतो. डाळिंबाच्या खोडास लहान छिद्रे पाडणाऱ्या भुंगेऱ्यांमुळे (शॉट होल 'बोरर'मुळे) मुख्य खोडावर आणि मुळावर लहान-लहान छिद्रे दिसतात.
डाळिंबाच्या झाडाला खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यावर एखादी फांदी किंवा पूर्ण झाड वाळते.
शॉट होल बोररच्या नियंत्रणासाठी गेरू ४०० ग्रॅम + लिंडेन २० टक्के प्रवाही २.५ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही ५ मिली + ब्लायटॉक्स २.५ ग्रॅम प्रती लिटर या प्रमाणात मिश्रण तयार करून त्याचा खोडास मुलामा देतात.. तसेच लिंडेन किंवा क्लोरोपायरीफॉस + ब्लायटॉक्स वरीलप्रमाणे घेऊन .प्रती झाड ५ लिटर द्रावण खोडाशेजारी मुळांवर ओततात.
खोडकिडा नियंत्रणासाठी फेनव्हलरेट ५ मिली किंवा डायक्लोरव्हॉस १० मिली प्रती लिटर या प्रमाणात इंजेक्शनद्वारे छिद्रांत सोडून छिद्रे चिखलाने बंद करतात..
डाळिंबाच्या झाडावर पडणारा तेलग्या नावाचा रोग खूप नुकसान करतो.
डाळीिंब पिकावरील किडी
[संपादन]- फळ पोखरणारी माशी
- तुडतुडे
- अतिउष्णतेमुळे डाळिंबावर डाग पडतात.
- मर
लागवड
[संपादन]डाळिंबाची लागवड कलम लावून करता येते. अशी लागवड अफगाणिस्तान, अमेरिका, इजिप्त, इस्राईल, चीन, जपान, पाकिस्तान, ब्रह्मदेश,भारत, रशिया, आणि [[स्पेन] या देशांमध्ये करतात. डाळिंबाच्या झाडांना उष्ण, दीर्घ उन्हाळा, कोरडी हवा व साधारण हिवाळा अधिक मानवतो.
महाराष्ट्र
[संपादन]भारतात लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन प्रमाण यांत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये डाळिंबाच्या लागवडीखालील क्षेत्र आहे. नगर जिल्ह्यातील पाथर्डी व राहुरी या तालुक्यातील भाग तर नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या भागात डाळिंबाची लागवड होते. भगव्या जातीच्या डाळिंबाला बाजारपेठेत मागणी असते.
- सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आहे.
यवतमाळ येथेही वृक्षवल्ली डाळिंब उत्पादन प्रकल्प, मुकुटबन, तांभेरे असे प्रकल्प झाले आहेत. पिंपरी निर्मळ जिल्हा नगर येथेही प्रकल्प आहेत. तालुका निहाय विचार केल्यास पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे जवळपास पंचवीस हजार एकरच्या आसपास डाळिंब लागवड झालेली आहे . या फळाला जास्त पाण्याची गरज नसते, जमीन खडकाळ असेल तरी त्यामध्ये लागवड करता येते. ठिबक सिंचन वापरून या पिकाचे उत्पादन घेतले जाऊ शकते.
निर्यात
[संपादन]नाशिक येथून डाळिंबांची निर्यात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लासलगाव येथील विकिरण केंद्रात डाळिंबावर विकिरण प्रक्रियाही सुरू झाली आहे.
- सोलापूर[सागोला] येथून डाळिंबांची निर्यात सुरू झाली आहे.
पुस्तके
[संपादन]- कल्पवृक्ष डाळिंब - लेखक डॉ. वि.ग .राऊळ, साकेत प्रकाशन.
- 'कसमा' पट्ट्यातील डाळिंब शेतीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे योगदान - लेखक आय.आर. सय्यद
- गणेश डाळिंब - लेखक भी.गो. भुजबळ, कॉन्टिनेन्टल प्रकाशन)
- डाळिंब फळझाडाचा बहार कसा धरावा? - लेखक डॉ. विनायक सुकदेव बावसकर
- डाळिंब लागवड आणि उत्पादन - लेखक एस.बी. पुजारी, लोकसंस्कृती प्रकाशन
- डाळिंबाची यशस्वी लागवड - लेखक डॉ. विनायक सुकदेव बावसकर
- प्रतिकूल परिस्थितीत डाळिंब बहारातील फुलकळी निघण्यातील समस्या व उपाययोजना - लेखक आय.आर. सय्यद
बाह्यदुवे
[संपादन]- डाळिंब खाण्याचे फायदे Archived 2022-02-23 at the Wayback Machine.
- डाळिंब लागवड कशी करावी? Archived 2016-03-05 at the Wayback Machine.